Wednesday, April 11, 2018

वामवृत

सातारा लुटून पुण्याला दान....
मित्रच असतो शत्रू

शासकीय नोकरीतून वाममार्गाने कमविलेला पैसा हा कधी ही कामात येत नाही. अशी काय ती परिस्थिती नव्याने सरकारी नोकरीत आलेल्या व जुने जाणते झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसमोर नित्याने येते. आपली माणसांबद्दलची पारख कधी चुकते तर कधी समोरचा व्यक्तीच आपल्याला फसवण्याच्या उद्देशाने काम करत असतो. त्याने फसविले की मग नसती डोकेदूखी सुरु होते. नको ते आजार शरीराला व मनाला उद्भवतात. वाममार्गाने कमविलेला पैसा सत्कारणी तर लागत नाही पण, मनाला विंवचना आणि शरीराला व्याधी निर्माण करण्यास पुरेसा ठरतो.
माणसाला मिळेल त्यात समाधान मानण्याची बुध्दी काही लोकांनाच असते. शासकीय सेवेत असताना अनेकदा प्रलोभनातून आणि इतरांचे व्यावसायिक काम केल्यानंतर मिळणारा वरचा पैसा हा पगारापेक्षा दुप्पट तिप्पट असतो. हा कोट्यावधीचा पैसा कुठे गुंतवावा, तो ना नातेवाईकांच्या नावाने करता येतो ना स्वतःच्या नावाने. मग या वाममार्गाने कमविलेल्या पैशांना पाय फुटतात. आपल्या ओळखीतील मित्रांना गुंतवण्यासाठी हा पैसा आपण मोठ्या विश्वासाने तो देतो. पण, हे ओळखीतील मित्र पण मोठे हुशार असतात. त्यांना मिळालेला हा पैसा ते गुंतवतात त्यात त्यांचा फायदा काढून घेतात. पण, हा गुंतविलेला पैसा कधी चुकीच्या ठिकाणी गुंतवल्याने त्याची माती होते. आपण, मोठ्या कष्टाने हो, हो, वाम मार्गाने स्वतःची बुध्दी वापरून कमविलेला पैसा मातीत जातो. कारण काय तर त्यावर ना आपला अधिकार राहतो ना तो खर्च करण्याची आपली हिंमत. मग असा पैसा कमवून त्याने दूसऱ्याचे घर भरण्याचा व त्यातुन स्वतःच्या आजारपणाची सुरुवात करायची, नस्ती डोकेदूखी लावायची हे उद्योग सांगितले कोणी. हा पैसा कुठे गुंतवावा यासाठी काही चांगले मित्र सल्ला पण देतात. पण, मित्रांची पारख आपल्याला नसते. ती नसल्याने मग व्हायला नको ते होते. पैसा ही जातो आणि श्रम ही मागे उरते ती फक्त डोकेदूखी, मनस्ताप आणि चिंता.
अशा प्रकारे वाममार्गाने पैसा न कमविता देखील आपण, शांतपणे नोकरी करु शकतो. माणसाच्या, कुटुंबाच्या गरजा पुर्ण करण्या इतपत सरकार नोकरीच्या ठिकाणी पैसा देतो. पण, अधिक संपत्ती जमा करण्याची स्पर्धा आणि हाव यामुळे आपण बेधुंद होऊन ती कमवितो. पण, त्यातून जीवनाचा सुंदर प्रवास आपण करत नाही. हे जीवन एकदाच मिळते ते केवळ पैसे कमविण्यासाठी नाही तर त्यातुन स्वतःला, परिवाराला आनंद देता यावा यासाठी हे जीवन असल्याचा आपण सर्वांना विसर पडतो. पैसा कमवावा पण, तो गरजे पुरता कमवावा. खुप रिस्क घेऊन पैसा कमविण्याचा हट्टाहास टाळण्याची गरज आहे. आपण, ज्या पध्दतीने पैसा कमवितो ती पध्दत निश्चित योग्य आहे का याची विचारणा आपण तो ज्यांच्यावर खर्च करतो त्यांना तरी एकदा विचारुन बघा. त्यांचे काय मत आहे अशा प्रकारे पैसा कमविण्याला.
नुकतीच अशीच एक सत्य घटना समोर आली. जवळचे दोन मित्र असतात पण, डोळ्यावर पैसा कमविण्याचा इतकी झापड असते की आपला सच्चा मित्र कोण आणि फसविणारा मित्र कोण याची ना जाणीव होते ना भान राहते. सच्या मित्र चांगल्या गोष्टीत गुंतवणूकीचा सल्ला देतो. फसविणारा मित्राचे टार्गेट फिक्स असते तो सांगतो शेअर मध्ये पैसा गुंतवा, फ्लॅट घ्या आणि मग अशा गुंतवणूकीत फायदा झाला नाही तर तो स्वतः  हात वर करतो. यावेळी तुम्ही देखील काही करु शकत नाही कारण तुमच्या घामाचा पैसा तो नसतो. पण, त्या पैशावर फसवणूक करणाऱ्या मित्राची चैन झालेली असते. तुम्हाला तो उल्लू बनवून पुन्हा अशाच नव्या मित्राचा शोध घेतो व त्याला चंदन लावून दिवाळी साजरी करतो. त्यामुळे चांगल्या मित्रांचा शोध घ्या, पैशांचा हव्यास कमी करा, तर जीवनातील आनंद कायम राहील अन्यथा, मार्ग तो वामच....